पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादामधून एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून आरोपींनी सिद्धार्थची हत्या करण्याचा प्लान आखला. रविवारी रात्री आरोपींनी शहरातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थला गाठलं आणि मारहाण सुरू केली. सिद्धार्थने आरोपींच्या तावडीतून सुटका करत पळ काढला. तेव्हा आरोपी त्याच्या पाठीमागे कोयते घेऊन लागले. जीव वाचवण्यासाठी सिद्धार्थ ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला. मात्र, आरोपींनी त्याला पाठलाग करत गाठलं. जीव वाचवण्यासाठी सिद्धार्थ आरोपींकडे माफीची याचना करत होता. पण, आरोपींनी कुठलीही दयामाया न दाखवता त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत सिद्धार्थच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, ओसवाल बिल्डिंगवर हत्या झाल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कोयत्याने सपासप वार करत तरुणाची हत्या












