खुन्नसने का पाहतो म्हणत तीन जणांनी एका तरुणावर धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना कोरेगाव पार्क येथे घडली आहे। ही घटना शनिवारी (दि.१३) रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान साऊथ मेन रोडवरील संत गाडे महाराज वसाहत समोर घडली आहे। याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
याबाबत अक्षय बबन राजगुरू (वय-२९ रा. संत गाडे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) याने रविवारी (दि.१४) कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मर्फी विनायक अवसरमल (वय-२६) गौरव उर्फ सोन्या गंगाराम हातेकर (वय-२७) भायड्या गायकवाड (वय-२८ सर्व रा। संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) यांच्यावर भा.दं.वी. कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ सह आर्म ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहतात। अक्षय हा शनिवारी रात्री वसाहती समोरील वडाच्या झाडाजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन अक्षय सोबत वाद घातले. आरोपी हातेकर याने माझ्याकडे खुन्नसने का पाहतो असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर मर्फी याने त्याच्याकडील चाकूने अक्षयच्या पोटात व मांडीवर वार करुन गंभीर जखमी केले. आरोपी गायकवाड याने त्याच्याकडील कोयता काढून ‘तुला आज ठेवणार नाही, एकदाच संपवुन टाकतो, आम्हाला आत जावे लागले तरी चालेल’ असे म्हणून अक्षयच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अक्षय याने रविवारी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरमकर करीत आहेत.












