पुणे : आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर ट्विट करत एक प्रश्न उपस्थित केला आहे, व या ट्विटला त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना टॅग केला आहे त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी ‘महाराष्ट्रात निविदा घोटाळेबाजांच्या कारवाया थांबायला तयार नाहीत.
मागील काही दिवस अवघा महाराष्ट्र सत्तेचा खेळ पहात होता.

मात्र त्या अवधीत निविदा घोटाळे बहाद्दर काही हजार कोटी रुपयांची अल्प मुदतीची निविदा काढून मोकळे झाले. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे हे कंत्राट यापूर्वीही म्हणजे सप्टेंबर २०२३ मध्ये निघाले होते. मात्र काही कारणाने ते रद्द करण्यात आले. आता पुन्हा नव्याने सदर कामाचे कंत्राट नव्या अटी शर्तींसह काढण्यात आले असून ते भरण्यासाठी अवघ्या) ७ दिवसांची (४ जानेवारी २०२४ ते १३ जानेवारी) मुदत देण्यात आली आहे.
इतकी मोठी निविदा एवढ्या कमी कालावधीत कोण आणि कसं भरणार? या निविदेला पुरेशी प्रसिद्धी का दिली नाही?. एवढी मोठी निविदा अल्प मुदतीची काढणे कायद्याला धरून नाही, पुरेशी प्रसिद्धी न मिळताही सदर निविदा भरणारे कुणाचे चेले चपाटे आहेत? सदर निविदेचे एकूण मूल्य ७ ते ८ हजार कोटी रूपये असल्याचे बोलले जाते.’ अशा प्रकारचा उल्लेख केला आहे.












