सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा नवीन प्रकार उघडकीस, हे चोर प्रतयेक दिवस नवनवीन पद्धती शोधत असतात. पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले असल्याचे सांगून गुन्ह्यामध्ये अडकविण्याची भीती दाखवत आर्थिक लूट केली जात आहे. पुण्यातील येरवडा व सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या दोघांना अशाच प्रकारे भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. सायबर चोरट्यांनी दोघांकडून तब्बल ३१ लाख रुपये उकळले आहे.
वडगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना ८२१६५३०६३६ या मोबाईल धारकाने संपर्क साधला. त्याने हर्षवर्धन बोलत असून मुंबई सायबर क्राईम ब्रँचमध्ये अधिकारी असल्याचे सांगितले. तुम्ही मुंबई येथून तैवान येथे पाठविलेल्या पार्सलमध्ये एक्सपायर पासपोर्ट, एस.बी.आय. क्रेडिट कार्ड व ४५० ग्रॅम ड्रग्ज सापडले असू तुम्ही पाठवलेले पार्सल परत आल्याचे सांगितले. यावर फिर्यादी यांनी आपण कोणतेही पार्सल तैवानला पाठविले नसल्याचे सांगितले.
त्यावर आपल्या नावानेच बुकिंग करण्यात आली असल्याचे सायबर चोरट्याने सांगितले. तसेच तुमचे बँक खाते व्हेरिफाय करायचे असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून २७ लाख ९८ हजार ७७६ रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी हा गुन्हा सिंहगड रोड पोलिसांकडे वर्ग केला आहे. सिंहगड पोलिसांनी मोबाईल धारकावर भा.दं.वि . कलाम ४१९, ४२० सह आय.टी. ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ मध्ये फिर्याद यांच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर करीत आहेत.
येरवडा येथील तरुणाची सव्वातीन लाखांची फसवणूक
अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी वडगाव शेरी येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीची सव्वा तीन लाखांची फसवणूक केली आहे. याबाबत त्याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ९४३८०१६८७५ मोबाईल धारक, स्काईप आयडी धारक व आयसीआयसीआय बँक खाते धारकावर आयपीसी ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२३ मध्ये फिर्यादी यांच्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.
मोबाईल धारकाने फिर्यादी यांना फोन करुन मुंबई येथील फेडेक्स कंपनी मधून जयदिप राजपुत व मुंबई क्राईम ब्रँच ऑफिसर नरेश गुप्ता बॅनर्जी बोलत असल्याचे सांगितले. त्याने खोटे कागदपत्रे पाठवून मुंबई पोलीस दलातील क्राईम ब्रँचमध्ये काम करत असल्याचे भासवले. तसेच मुंबई पोलिसांचे ओळखपत्र पाठवले.
तुमच्या नावाने मुंबई येथून थायलंडला पर्लस पाठवण्यात आल्याचे खोटे सांगून अटक करण्याची भीती दाखवली. तसेच केस क्लिअर करण्यासाठी व एनओसी सर्टिफिकेट देण्याचे सांगून फिर्यादी यांना 3 लाख २६ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्य़ादी यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी हा गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे गायकवाड करीत आहेत.












