अजित पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागांवरुन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले. रायगडचे सध्याचे खासदार अजित पवार गटाचे सुनील तटकरेच आहेत, मात्र इतर तीन मतदारसंघात सध्याचे खासदार शरद पवार गटाचे आहेत.
शिरूरमध्ये अमोल कोल्हे, साताऱ्यात श्रीनिवास पाटील आणि बारामतीत सुप्रिया सुळे आहेत. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणाऱ्या बारामतीमध्ये स्वत:चा उमेदवार देऊन बहीण सुप्रिया सुळेंची वाट बिकट करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे की बारामती मतदारसंघ भाजपच्या ताब्यात जाऊ न देता पवारांच्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न आहे का, अशा अनेक प्रश्नांसह अजित पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
यावरून खासदार सुप्रिसा सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी भारताची आणि महाराष्ट्रातील नागरिक आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढणार हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी मनापासून याचं स्वागत करते, कारण ही लोकशाही आहे.”“आमची नाती एका जागेवर आहेत आणि राजकारण वेगळं आहे. प्रोफेशन आणि नात्यात कधीच गल्लत करायची नसते. मी लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा केली आहे. लोकशाहीत कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. यात काहीही गैर नाही. माझ्याविरोधात कुणीतरी लढलंच पाहिजे, हा माझा आग्रह राहिला आहे. बाकी महाराष्ट्र आणि बारामतीतील मायबाप जनता ठरवेल,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.












