
पिंपरी चिंचवड शहराला लागलेली संघटीत गुन्हेगारीची कीड मुळासकट नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ‘मोक्का पॅटर्न’ अवलंबला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंमलबजावणीत आल्यापासून सर्वाधिक टोळ्यांवर चालू वर्षात प्रभावी कारवाई झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक टोळ्या आणि त्यातील सुमारे ३०० सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात काम, नोकरी आणि शिक्षणासाठी आलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा लोकांमध्ये दहशत निर्माण करून परिसरात वर्चस्व निर्माण करायचे, अशी लक्षणे असलेल्या भुरट्या आणि स्वयंघोषित भाईंना यावर्षी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्कासारख्या कायदेशीर कारवायांच्या माध्यमातून पोलिसांनी वचक निर्माण केला आहे. पोलीस आयुक्तालयाची सुरुवात १५ ऑगस्ट २०१८ रोजी झाली. सुरुवातीला गुन्हेगारी टोळ्यांवर संथगतीने कारवाई झाली. मात्र या टोळ्यांच्या कुरापती वाढत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी मोक्का सारख्या प्रतिबंधात्मक कारवायांना सुरुवात केली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्येच खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा लावून गुन्हेगारांवर कारवाया करण्यास सुरुवात केली.
मागील ११ महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तब्बल ३९ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळ्यांमध्ये २९३ गुन्हेगार आहेत. ही कारवाई मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक आहे. त्यातच मागील वर्षभरात मावळ परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याने पोलिसांची तिकडच्याही गुन्हेगारांवर वक्रदृष्टी पडली. मावळ परिसरातील ८ टोळ्यांमधील ७३ गुन्हेगारांना कारागृहात डांबले.
या सगळ्या कारवायांमध्ये पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सह पोलीस आयुक्त स्वप्न गोरे (गुन्हे), सहा पोलीस आयुक्त विवेक पाटील (परिमंडल १), सह पोलीस आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे (परिमंडल २), सह पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे (परिमंडल ३) व सहा. पोलीस आयुक्त शिवाजी पवार (विशेष शाखा) यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोक्का अंतर्गत केलेली कारवाई –
वर्ष टोळ्या गुन्हेगार
2018 1 7
2019 9 59
2020 9 50
2021 26 187
2022 18 129
2023 39 293












