पुणे : कोथरूड मध्ये ठिकठिकाणी बॅनर लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सुनील कांबळे यांचा निषेध व्यक्त केला. ससून हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमांमध्ये स्टेजवरून उतरत असताना तोल जाऊन पडणाऱ्या सुनील कांबळे यांना सावरणाऱ्या पोलिसाच्या कानशिलात लगावल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप आमदार आमच्या रक्षकांचे भक्षक बनले असल्याच्या घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यावेळी जनतेचे लक्ष वेधून घेतले.
अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले की हा एका पोलिस कर्मचाऱ्याचा नसून संपूर्ण महाराष्ट्र पोलिसाचा व त्याबरोबरच सामान्य जनतेचाही अपमान आहे. जर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी मीडिया व कॅमेरा असताना आणि जनतेने गजबजुन भरलेल्या समारंभाच्या ठिकाणी भाजप आमदार असे वागत असतील तर जनतेने विचार करायला हवा की हे त्यांच्याशी कसे वागतील असेही गिरीश गुरूनानी यांनी सांगितले.
भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवली आहे.












