भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला २९२ धावांवर बाद केले. भारतीय संघाने इंग्लंड समोर ३९९ धावांचे आव्हान ठेवले होते. विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोमवारी पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी धुव्वा उडवला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारतीय संघाच्या या विजयात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांनी मोलाचे योगदान दिले. हैदराबादमध्ये झालेली पहिली कसोटी इंग्लंडने २८ धावांनी जिंकली होती.
दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालने 209 धावांची खेळी (290 चेंडू, 19 चौकार आणि सात षटकार) खेळली. पहिल्या डावात यशस्वीशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 35 धावांचा आकडाही गाठता आला नाही. इंग्लंडकडून शोएब बशीर, जेम्स अँडरसन आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांत आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सहा खेळाडूंना आऊट केले. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 143 धावांची मोठी आघाडी मिळाली. यानंतर भारताने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. भारतासाठी दुसऱ्या डावात शुभमन गिलने 147 चेंडूंचा सामना करत 104 धावा केल्या. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने चार बळी घेतले.
३९९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ खूपच कमकुवत दिसत होता. संघाची सुरुवात चांगली झाली होती बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. यानंतर जॅक क्रॉली आणि रेहान अहमद यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने २१.५ षटकांत ९५ धावांत २ विकेट गमावल्या. संघाला पहिला धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला, त्याने ६ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. याशिवाय दुसरा धक्का रेहान अहमदच्या रूपाने बसला, ज्याने ५ चौकारांसह २३ धावा केल्या. यानंतर सातत्यान विकेट्स पडत राहिल्याने त्यांना लक्ष्यापर्यंत पोहोचणे अवघड झाले.












