खेळांकडे मनोरंजनाचं साधन म्हणून बघितलं जातं. मात्र, आजकाल खेळांमधील खेळभावना नाहीशी होत असल्याचं चित्र आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका व्यक्तीचा जीव गेला आहे.
तिथे क्रिकेट खेळताना झालेल्या वादानंतर तिघांनी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा एक्स्टेंशनमध्ये रविवारी क्रिकेट मॅचदरम्यान ‘नो बॉल’मुळे झालेल्या वादात ही घटना घडली. तिघांनी 24 वर्षांच्या तरुणावर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव सुमित असं आहे. तीन आरोपींनी हल्ला केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात तो एका नाल्यात पडला होता. मात्र, तरीही आरोपींनी त्याच्यावर दगडांनी हल्ला सुरूच ठेवला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, मृत तरुणाच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलीस तक्रार केली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सर्व आरोपी मेरठमधील रहिवासी आहेत.
पोलीस उपायुक्त (मध्य नोएडा) हृदेश कठेरिया यांनी सांगितलं की, बिसरख पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना दुपारी चिपियाना गावाजवळ क्रिकेट मॅचदरम्यान झालेल्या भांडणाची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सुमितने हल्लेखोरांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो नाल्यात पडला. तिघांनी त्याच्या डोक्यावर दगड फेकून मारले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
अधिकारी म्हणाले, सुमितच्या कुटुंबीयांनी तक्रार केली असून पुढील तपास सुरू आहे. मुख्य आरोपी हिमांशू आणि इतर दोघांविरुद्ध बिसरख पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुमितचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील जळगावमध्येही अशीच घटना घडली होती. या घटनेत, प्रतिस्पर्धी क्रिकेट टीममधील खेळाडूंनी शुभम आगोणे (वय 28 वर्षे) याच्यावर तलवारी आणि क्रिकेट स्टंपने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. 28 वर्षांचा सुभम आगोणे हा मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल होता आणि तो सुट्टीसाठी गावी आला होता. त्याच्यावर प्रतिस्पर्धी क्रिकेट टीममधील 10 ते 12 जणांनी तलवारी आणि क्रिकेट स्टंपने हल्ला केला होता. जखमी शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी 12 जणांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा विविध गुन्ह्यांखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता.












