पुण्यात चुलता-पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. स्वत:च्या १५ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने बलात्कार केला. तसेच ती गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते आजपर्यंत पीडित मुलीच्या लोहगाव येथील घरात घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओंकार प्रमोद कदम (वय-२८ रा. पेढांबे ता. चिपळूण जि. रत्नागिरी) याच्यावर आयपीसी ३५४, ३५४अ, ३७६, ३७६/३, ३१३ सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा चुलत दिर आहे. आरोपीने फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हा प्रकार घरच्यांना माहित झाल्यावर त्याला समजावून सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर देखील त्याने मुलीसोबत संपर्क ठेवला. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलगी गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.












