राज्यसरकारला मराठा आरक्षणाबाबत दिलेली मुदत उद्या संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा होत आहे.
जरांगे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहता बीड शहरातील आज सर्व शाळा बंद असणार आहे.
शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमातील सगळ्याच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड शहरालगत आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे आणि यावेळी एकीकडे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केलेला असतानाच शहरांमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली निघणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना कोणताही त्रास होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांनी शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “बीड शहरातील सर्व शाळा 23 डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात यावे. याबाबत दक्षता घ्यावी” असे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे बीड शहरात आता एकूण तीन दिवस शाळा बंद असणार आहेत. कारण शनिवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. त्यानंतर रविवारची सुट्टी असेल आणि सोमवारी नाताळ सण असल्याने शासकीय सुट्टी असणार आहे.












