आज 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’आजच्या दिवशी सुरू केले होते.बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 दिवशी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते.
दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील अध्यापक पत्रकार आहेत.6 जानेवारी 1812 ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या 34 वर्षांचे होते.
पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. बाळशास्त्री जांभेकर यांचे पहिलं मराठी दैनिक 6 जानेवारीला प्रसिद्ध झाल्याने हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.मराठी पत्रकारितेला त्यांनी देशात एक वेगळे स्थान निर्माण करून दिले.
बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. भाषांसोबतच विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र आणि सामान्य ज्ञान या विषयांचीही चांगली जाण होती.












