मुलाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने दोन सराईत गुन्हेगारांनी गाडीची तोडफोड करुन एकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना २७ डिसेंबर रोजी सायंकाळी सडेसहाच्या सुमारास येरवडा येथील करुणा हौसींग सोसायटीत घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत अंकुश राम शिंदे (वय-४७ रा. करुणा हौसींग सोसायटी, येरवडा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी शनिवारी (दि.३०) येरवडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. यावरुन समीर शेख व उबेद (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०७, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ सह आर्म ऍक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश शिंदे यांचा मुलगा आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शिंदे यांचा मुलगा आरोपींसोबत बोलत नसल्याने व त्यांच्यासोबत राहत नसल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरुन आरोपींनी शिंदे यांच्या मुलाला शिवीगाळ केली होती. याचा जाब अंकुश शिंदे यांनी विचारला होता. याचा राग आरोपींना आला. बुधवारी (दि.२७) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी घरासमोर लावलेल्या गाडीची तोडफोड केली. तसेच शिंदे यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी जीव वाचवण्यासाठी घरात गेले असता आरोपींनी घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले.
यानंतर हतातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक होले करीत आहेत.












