शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल येणार आहे. हा निकाल काय लागू शकतो, यावरती महायुतीसह महाविकास आघाडीतील नेते वेगवेगळे कयास लावत आहेत. काही नेते या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊन दुसरा एखादा नेता मुख्यमंत्रिपदावर विराजमान होईल, असादेखील अंदाज लावण्यात येत आहे. आता याबाबतच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबजनक विधान केलं आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील अंतिम निकाल बुधवारी दुपारी 4 वाजता विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. या अपात्रता प्रकरणाच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असतानाच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज पुण्यामधील एका कार्यक्रमादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध राजकीय विषयांवर आपले मत मांडले.
चव्हाण म्हणाले, ‘पुणे लोकसभेसाठी अनेक लोक इच्छुक आहेत. इच्छुकांचे तब्बल 20 अर्ज प्राप्त झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्याची जागा काँग्रेसकडे राहील,’ असे वाटत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच ‘दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व मित्रपक्षांसमवेत उत्तम चर्चा झाली असून 18 आणि 19 जानेवारीला आणखी एक बैठक होईल,’ अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
महाविकास आघाडीत वंचित सहभागी होऊ इच्छित आहे. मात्र आघाडीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकाश आंबेडकर उघडपणे काही भाष्य करतात. यावर चव्हाण म्हणाले, ‘वंचित बहुजन आघाडी हा मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबतसुद्धा चांगली चर्चा झाली आहे. जागावाटपाची चर्चा मीडियासमोर नाही बंद खोलीत झाली पाहिजे,’ असा सल्ला त्यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला.












