सांगोला तालुक्यातील महूद गावामध्ये पहाटेच्या सुमारास भीषण स्फोटाची घटना घडली असून त्यात एका तरुणाचा मृत्यु झाला तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की बिल्डिंग अक्षरश उध्वस्त झाली आहे. स्फोटाच्या आवाजाने सुमारे १ किमीचा परिसर हादरुन गेला. नेमका कशाचा स्फोट झाला हे नेमके समजू शकले नाही.
अतुल आत्माराम बाड (वय २७, रा. विठ्ठलापूर, ता. आटपाडी) मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. दीपक विठोबा कुटे (रा. शिवापुरी, ता. आटपाडी) असे जखमीचे नाव आहे. कुटे याच्यावर पंढरपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.महूद येथील दिघंची रोडवरील एका बिल्डिंगमध्ये शुक्रवारी पहाटे अचानक मोठा स्फोट झाला.
या स्फोटात बिल्डिंगचा एक मजला पूर्णपणे उध्वस्त झाला. समोरील शटर सुमारे २५० फुट अंतरावर जाऊन पडले.
दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर सांगोला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमीला रुग्णालयात हलविले आहे. हे दोघे बिल्डिंगमध्ये नेमके काय करत होते. स्फोट कशामुळे झाला, याचे नेमक कारण अद्याप समोर आले नाही. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बाड याच्या नातेवाईकाने व्यक्त केला आहे.












