सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून पेरुगेट चौकीजवळ एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून आरोपीने तिच्यावर कोयत्याने वार केले होते.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २०, रा. डोंगरगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.
मागील पाच वर्षांत आरोपीविरुद्ध विश्रामबाग आणि कोथरूड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गंभीर दुखापत असे गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. विश्रामबाग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली.












