येवला : जिद्द, शिकण्याची उमेद आणि अभ्यासाची तळमळ असली की यश नक्की मिळते. हे या ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे. वर्षभर शाळा करून रोज शेतीकामात आई-वडिलांना मदतीचा हात देतानाच कधी पायी तर कधी सायकलवर शाळेत येत विद्यार्थिनींनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे..
धामोडे येथील गुरुदत्त माध्यमिक विद्यालयचा निकाल १०० टक्के लागला. अतिशय प्रतिकूलतेवर मात करत अभ्यासाची जबाबदारी निभावत स्नेहल बापू त्रिभुवन हिने ९१.६० टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक (Ssc Topper) पटकावला. प्रतिकूलतेवर मात करत मिळविलेल्या तिच्या उत्तुंग यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वर्षभर कधी सायकलवर तर कधी पायी शाळेत येऊन शिक्षणाची आवड जपणारी प्रतिभा साहेबराव भड हीने ८९.६० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
धामोडा येथील अतिशय गरीब कुटुंबातील स्वाती आसाराम कांबळे ८८.४०टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. विद्यालयाचे ४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून खूप खूप अभिनंदन करण्यात आले सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.











