पुणे : गँगस्टर शरद मोहोळ यांची दोन दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सध्या या घटनेची पुणे शहरात एकच चर्चा सुरू आहे. अशातच शरद मोहळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी स्वाती मोहोळ यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेबाबत तुम्हाला भेटून सविस्तर सांगायचे असल्याची भावना व्यक्त केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी हो म्हणत त्यासाठी तुम्हाला वेळ दिली जाईल असं आश्वासन दिलं.
स्वाती मोहोळ ह्या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. शरद मोहोळ यांच्या हत्येची लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. स्वाती मोहोळ यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल २०२३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली.
मोहोळवर गोळीबार करणारे मारेकऱ्यांनी सातारच्या दिशेने वाहनातून पळायचं ठरवल होतं. मात्र त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन पुणे पोलिसांनी लगेच त्यांचा पाठलाग सुरु केला आणि शिरवळ जवळ आठ जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. या आठ आरोपीमध्ये या दोन वकिलांचा देखील सहभाग आहे. आरोपींना पळून जाण्यास वकिलांनी मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.












