पुणे : प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी दिलेले बांधकामाचे काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट काढून घेतले. याचा राग आल्याने चार जणांनी एका व्यक्तीला शिवगाळ करुन स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि. ६) वानवडी येथील शिवम नाकोडा बिल्डकॉन कंपनीच्या पार्किंगमध्ये घडला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जखमी सनी कुलयशराय बजाज (वय-४१ रा. पुणे कॅम्पस, विमाननगर, पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे। यावरुन विरेंद्रसिंह विक्रमसिंह जाधवराव, रविंद्र कदम पाटील, सचिन बाळकृष्ण सरकाळे, शिवतेज रामदास बबिवे यांच्यावर भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी बजाज व विरेंद्रसिंह जाधवराव हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सनी बजाज यांच्या कंपनीने जाधवराव याला शिवम नाकोडा बिल्डकॉन या कंपनीमध्ये प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी बांधकामाचे काम दिले होते. मात्र, जाधवराव याने काम पूर्ण केले नाही। त्यामुळे कंपनीने कॉन्ट्रॅक्ट काढून घेतले। याचा राग मनात धरुन आरोपी जाधवराव हा त्याच्या इतर साथीदारांसह केपीसिटी मॉलच्या पार्कींगमध्ये आला। त्याने फिर्यादी यांना तु आमच्या कामात ढवळाढवळ करु नको, व कंपनीमध्ये आमच्या मागिल व्यवहाराचे मुळ कागद पत्र काढून दे असे म्हणत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तर रविंद्र कदम पाटील याने सोबत आणलेल्या स्टीलच्या रॉडने फिर्यादी यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.












