संसदेचे कामकाज सुरु असताना दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्याची घटना घडली. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणे बंद केले आहे. दोन्ही सभागृहात गॅलरी पास देणं बंद केलं आहे.
लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने तात्काळ हा निर्णय घेतला आहे. विधान परिषद उपासभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सभागृहात माहिती दिली. विधानसभेत आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार आहेत. अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
संसदेतील आजच्या घटनेनंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली. लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधिमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली आहे.












