पुणे : आजारी असल्याचा बहाणा करुन मैत्रिणीला बोलावून घेतले. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेऊन एका व्यक्तीसोबत शाररिक संभंध करण्यास सांगितले असता पीडित तरुणीने त्याला नकार दिला. त्यावेळी आरोपी युवकाने तरुणीसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केला तसेच तिला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका तरुणीसह दोघांवर सर्मथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वारजे येथील १८ वर्षीय तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सतिश अंकुश काळे (वय-३१) व १९ वर्षीय तरुणीवर भा.दं.वि कलाम ३५४, ३५४अ, ३४२, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.८) रात्री सव्वा नऊ ते मंगळवारी (दि.९) सकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान सोमवार पेठेतील एका हॉटेलमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी १९ वर्षीय तरुणी या दोघी मैत्रिणी आहेत. आरोपी मैत्रिणीने पीडित तरुणीला फोन करुन तब्येत बरी नसल्याचे सांगून कोंढवा येथे बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी, तिची बहिण आणि इतर तीन मित्रांसह फिर्यादी यांना घेऊन सोमवार पेठेतील एका हॉटेलमध्ये आले. पीडित मुलगी हॉटेलच्या एका रूम मध्ये थांबली होती. त्यावेळी आरोपी तरुणीने फिर्यादी यांना सतीश काळे याच्यासोबत फिजिकल रिलेशन करण्यास प्रवृत्त केले. मात्र फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता आरोपी काळे अश्लील बोलून फिर्यादी सोबत गैरवर्तन केले. तसेच शरीर संबंधाची मागणी करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्याला नकार दिला असता आरोपी सतीश याने मी करमाळ्याचा दादा आहे अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास समर्थ पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक कुटे करीत आहेत.












