पुणे । प्रतिनिधी
पुणे दि. ०४ : महिलांनी घर- संसार सांभाळतानाच उद्योजकतेची कास धरावी, त्या उत्तम यशस्वी उद्योजक बनू शकतात कारण महिलांमध्ये मुळातच अष्टपैलू (मल्टिटास्किंग) काम करण्याची क्षमता असते. खाद्यपदार्थ तयार करणे विशेषतः पौष्टिक व रुचकर खाद्य पदार्थ तयार करण्याच्या व्यवसायात महिलांना उद्योजकतेच्या प्रचंड संधी आहेत, असे मत पूना गेस्ट हाऊस च्या संचालिका शर्मिला सरपोतदार यांनी व्यक्त केले.
यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्यावतीने महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र, अमित गार्डन रेस्टाँरंट येथे आयोजित दिवाळी फराळ प्रदर्शन व दिवाळी फराळ पाककृती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या स्पर्धेत तरुणींसह वयस्कर महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल शर्मिला सरपोतदार यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

या तीन दिवसीय स्पर्धेच्या पहिल्या दिवशी लाडू पाककृती स्पर्धेत ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये विविध प्रकारचे लाडू प्रकार सादर करण्यात आले. पौष्टिकता,रुचकरपणा व आकर्षक सजावट अशा निकषांच्या आधारे परीक्षकांनी या लाडू पाककृती स्पर्धेत मनिषा भावे या ७३ वर्षीय स्पर्धक महिलेला विजयी घोषित करण्यात आले.
हे दिवाळी फराळ व अन्य साहित्य प्रदर्शन सर्वांसाठी दिनांक पाच नोव्हेंबर पर्यंत विनामूल्य सुरु आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘यशस्वी’ संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षक गणेश साळवे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रसाद शाळीग्राम, प्रसाद महाडिक, वनराज मुऱ्हे,ओंकार भुवड आदींनी विशेष सहकार्य केले.












