गोपीनाथ मुंडे यांचा आज ( ३ जून ) स्मृतिदिन आहे पंकजा मुंडे (Pankaja Munde) या गोपीनाथ गडावर बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, जेव्हा भूमिका घेण्याची वेळ येईल, त्यावेळी आपण ती छातीठोकपणे घेऊ, मात्र मी ज्यांना नेता मानते, त्या अमित शहांना भेटून मी सविस्तर, मनमोकळं बोलणार आहे, ‘माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे हे एकदा विचारणार आहे ‘
दोन दिवसापूर्वी ‘मी भाजपची आहे, पण भाजप माझा थोडीच आहे ‘ या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ माजली असतानाच शनिवारी पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरून आपली भूमिका स्पष्ट केली.
२०१९ ला अनेक लोक निवडणूक हरले, त्यातील अनेकांना संधी दिली गेली . किमान दोन डझन आमदार खासदार झाले , मात्र त्यासाठी मी पात्र झाले नसेल कदाचित , मग लोक चर्चा करणारच. माझं नेतृत्व करावं असा राज्यात कोणी नाही, मला अमित शहांमध्ये माझा नेता सापडला आहे. त्यामुळे मी दिल्लीत जाऊन त्यांच्यासही चर्चा करणार आहे. माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे हे विचारणार आहे. ते कळल्याशिवाय माझ्या लोकांना काय सांगू हे विचारणार आहे, त्यामुळे त्य्नाच्या भेटीनंतर काय ते पाहू, पण ज्यावेळी भूमिका घेण्याची वेळ येईल तेव्हा छातीठोकपणे घेऊ असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले. यातून त्यांची राज्यातील नेतृत्वाबाबतची खदखद पुन्हा व्यक्त झाली आहे.
पंकजा या ओबीसी समाजाचा चेहरा आहेत. त्यांना एका मोठ्या राजकीय घराण्याचा वारसाही आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कामांची पुण्याईही आहे. त्यामुळे पंकजा यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला तर त्यामुळे पक्षाला मोठा फटका बसू शकतो. तसेच त्यांच्या नियमीत नाराजीच्या चर्चाही भाजपच्या पथ्यावर पडणाऱ्या नाहीत. या नियमीतच्या चर्चांमुळे पंकजा यांचे कार्यकर्ते आणि ओबीसीही भाजपवर नाराज होऊ शकतात. यामुळे पंकजा यांच्या नाराजीवर भाजपला तोडगा काढावा लागले.












